भारत उपांत्य फेरीत! अटीतटीच्या लढतीत न्यूझीलंडवर ३ धावांनी विजय
१३४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सलामीवीर प्रिस्ट १२ धावा करून माघारी परतली. पाठोपाठ अनुभवी सुझी बेट्सदेखील त्रिफळाचीत होऊन तंबूत परतली. कर्णधार सोफी डिव्हाईनही १४ धावा करून बाद झाली. त्यामुळे न्यूझीलंडची अवस्था ३ बाद ३४ झाली होती. त्यानंतर मॅडी ग्रीन आणि केटी मार्टीन यांनी डाव सावरला. या दोघींनी ४३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. अखेर राजश्री गायकवाडने जमलेली जोडी फोडली. फलंदाज मॅडी ग्रीन २४ धावांवर बाद झाली. लगेच केटी मार्टीनही २५ धावा करून माघारी परतली. त्यानंतर अमेलिया किर हिने तुफान फटकेबाजी केली. तिने ६ चौकार लगावत १९ चेंडूत नाबाद ३४ धावा केल्या. पण एका चेंडूत ५ धावा हव्या असताना अखेर न्यूझीलंडला ३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी आमंत्रित केले. संघात पुनरागमन करणारी स्मृती मानधना ११ धावांवर त्रिफळाचीत झाली. स्मृती लवकर बाद झाल्यावर शफाली वर्मा आणि तानिया भाटीया यांनी दमदार फटकेबाजी करत भारताला सातव्या षटकात अर्धशतकी मजल मारून दिली. यष्टीरक्षक तानिया भाटीया फटकेबाजी करताना झेलबाद झाली आणि भारताला दुसरा धक्का बसला. तानियाने २५ चेंडूत २३ धावा केल्या. त्यानंतरच्या फलंदाजांनी निराशा केली. मुंबईकर जेमिमा ८ चेंडूत १० धावा करून माघारी परतली. गेल्या दोन सामन्यात अपयशी ठरलेल्या कर्णधार हरमनप्रीतही केवळ १ धाव करून ती बाद झाली. धडाकेबाज खेळी करणारी सलामीवीर शफाली वर्मा हिला अर्धशतकाने हुलकावणी दिली. तिने ४६ धावा केली.
