गोविंदा, गोविंदा,
नटेश्वराचा पुजारी गोविंदा
नाट्यसृष्टीला वेगळा आयाम देणारे नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांचे रात्री निधन झाले. काळीज चिरणारी ही बातमी पसरली अन् नाट्य, सिनेसृष्टी काही क्षणासाठी रोडावली. हे व्यक्तीमत्वच इतके प्रांजळ आणि बॅकस्टेज कलाकारांपासून ते मुख्य नायकांवर समानतेने प्रेम करणारे होते. त्यांचे असे जाणे झाले, यावर कुणाचाच विश्वास बसत नाही, परंतु, ते आता त्यांच्या चाहत्यांसह मित्र-मैत्रिणींना काळजावर दगड ठेवून मान्य करावे लागणार आहे.
मेदूज्वराचा झटका आल्यानंतर कुटूंबियांनी ताबडतोब त्यांचे डॉक्टर तिवस्कर यांच्या करूणा रूग्णालयात दाखल केले. तातडीने शस्त्रक्रिया केली. ती यशस्वी झाली... आणि काही तासातच ते नटेश्वराच्या चरणी विलीन झाल्याची बातमी डॉक्टरांनी दिली. हृदय हेलवणारी ही बातमी सकाळीच आमचे मित्र, ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार मंगेश विश्वासराव यांनी दिली आणि डोळे किलकिले करत उठलो. चव्हाण यांच्या फोनवर संपर्क साधला असता, होऊ शकला नाही. ज्येष्ठ नाटककार आणि चव्हाण आणि आमच्यातील दुवा असलेले नाट्याचार्य गंगाराम गव्हाणकर यांना फोन लावला. परंतु, ते दिवाळीपासून कोकणात अडकले आहेत. त्यांचाही फोन नॉट रिचेबल होता. आता धक्धक अधिक वाढली होती. मग सिने आणि नाट्यअभिनेत्री सुप्रिया पाठारे यांच्याशी संपर्क साधला असता, दाटलेल्या कंठाने त्यांनी मित्र गेल्याच्या भावना व्यक्त केल्या. काही क्षण काहीच कळत नव्हते. काल, परवापर्यंत संपर्कात असलेले चव्हाण असे एकाएकी जातील, ही कल्पनाही मनाला कुणाच्या शिवली नसेल.
तितक्यात दादा गव्हाणकरांचा कोकणातून फोन आलाच. गोंविद गेल्याचे कळले का? असे हलव्या स्वरात त्यांनी विचारले आणि आम्ही निःश्बदच झालो. गोविंद गेल्याचे समजले आणि रात्र वैर्यासारखी अंगावर आल्याचे ते सांगत होते....गोंविद चव्हाण एक वेगळंच रसायन होतं. पाण्यासारखे शुभ्र, नितळ आणि ज्या रंगात मिसळले त्या रंगात स्वतःचे अस्तित्व मिसळूनही कायम ठेवणारे.
चव्हाण हे कोल्हापूरातील गडहिंग्लजमधील मूळ रहिवासी. ते मुंबईत आले आणि पक्के मुंबईकर झाले. स्वकष्टाने शिकून ते नोकरीला लागले. मुंबई वांद्रे येथील आयकर खात्यात अधिकारी पदावर होते. परंतु, सगळीकडे वावरताना, कधीही त्यांनी आयकर खात्याचा तोरा मिरवला नाही. एक साधे व्यक्तीमत्व म्हणून वेगळ्या धाटणीचे जीवन जगताना नटेश्वराची अखंड पूजा केली.
चव्हाण यांनी स्वतःची नाट्यसंस्था काढली आणि नाट्य रसिकांच्या भावनांच्या काळजाला विचारांचे, प्रबोधनाचे झुंबर लटकवत त्यांची आयुष्यच प्रकाशमान करत राहिले. एकापेक्षा एक सरस आणि ताकदीची, किंबहुना नाट्यक्षेत्रात क्रांती घडविणारी नाटकं त्यांनी रंगमंचावर आणली.
यु टर्न, मदर्स डे, वन रूम किचन, पांडूरंग फुलवाले, टाईम प्लिज, अलिकडे हिमालयाची सावली सुद्धा त्यांनी पुन्हा रंगमंचावर आणले. शरद पोंक्षे, डॉ. गिरीष ओक, सुप्रिया पाठारे असे नामवंत अभिनेते, अभिनेत्री त्यांच्या नाटकांमधून रसिकांच्या हृदयावर साम्राज्य गाजवत आहेत. ते यश त्यांनी रसिकांच्या चरणी अर्पण करून नटेश्वराच्या चरणी समर्पित होत जीवनाचा त्याग केला आहे.
बोरिवली नाट्य परिषदेचे अध्यक्ष असलेले गोविंद चव्हाण तीन वर्षापूर्वी एका वेगळ्या कारणाने मुंबईत गाजले. बाभईनाका येथील त्यांच्या इमारतीमध्ये गुजराथी-जैन समाजातील शेजारी असल्याने त्यांच्याकडून त्यांचा छळ करण्याचा प्रयत्न केला. मराठी माणूसच तो, त्यानेही उसळी घेतली. घरात मासे केले म्हणून अन्य धर्मिय शेजार्यांनी त्यांच्या दरवाजावर हल्ला चढविला. मुंबईत मराठी माणसावरील हा पहिला हल्ला नसला तरी तो एका आयकर खात्याच्या अधिकार्यावर आणि नाट्यनिर्मात्यावर होत असल्याने मराठ्यांची अख्खी मुंबई पेटून उठली. त्यांनी धडा शिकवण्याची शपथच घेतली. मनसे, शिवसेना चव्हाणांच्या मदतीला धावली. ते प्रकरण अंगलट आल्याने शेजार्यांनी माशांचा वास नाकाने घेत माघार घेतली. इथे अमराठी लोकांचे पानिपत झाले.
त्यांनी मराठी भाषेवर जितके प्रेम केले तितकेच ते गावागावातील बोलीभाषेवरही व्यक्त होत. त्यांनी भाषेचा गोडवा वाढावा आणि बोलीभाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा किमान जनतेच्या हृदयात तरी मिळावा म्हणून बोलीभाषेतील नाटकांच्या स्पर्धा घेतल्या. मराठी भाषा, तिच्या पोटजाती जतन करण्याचा ध्यास घेतलेले चव्हाण अद्भूत रसायन होते. मराठी नाट्यसृष्टीला त्यांनी वेगळा आयाम दिला. वेगळे पैलू पाडले. हे सगळं अगदी प्रसिद्धीला येत असतानही हा माणूस प्रसिद्धी पराडमुख राहिला. पण मित्रांच्या, मराठी हृदयात कायम स्मृतीरूपाने सर्वोच्च स्थानी राहणार आहे.
गोविंदा, गोविंदा, नटेश्वराचा पुजारी गोविंदा!
Featured Post
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
धान्यात 'सरकारी भेसळ' पांढर्या तांदळाने गरिबांच्या पोटाला पडला ‘चिमटा’ पनवेल/निर्भीड लेख वृत्त सरकारी धान्यात मिसळण्यात आलेल्या कृ...
-
विवेकानंद पाटलांच्या ‘पुरवठा मंत्र्यां’ना अटक कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी सीआयडीचा शेकाप नेत्यांना झटका पनवेल/निर्भीड लेख वृत्त गेल्...
-
पानसरेंनी ‘विवेक’ जपला! विशेष संपादकीय - कांतीलाल कडू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख गावगुंड आणि बैलगाडा शर्यतीतील सोशल...
-
वैचारिक वारसा लोप पावला! - कांतीलाल कडू अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच...
-
अतुल पाटलांनी श्रीरंग बारणेंची सुपारी घेवू नये! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या अध्यक्षांनी सुनावले पनवेल/निर्भीड लेख वृत्त ...